Ladki Bahin Gift : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’मुळे महाराष्ट्रातील लाखो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत. या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी मुंबई बँक एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना आता चक्क शून्य टक्के व्याजदराने १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
कसं मिळणार शून्य टक्के व्याजदराने कर्ज?
मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या ४ महामंडळांच्या काही योजना आहेत, ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या कर्जावरील १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दिला जातो. यामध्ये पर्यटन महामंडळाची ‘आई योजना’ तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि भटक्या विमुक्तांसाठीच्या महामंडळाच्या योजनांचा समावेश आहे.
याच महामंडळांच्या मदतीने, जर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिला या योजनांच्या अटींमध्ये बसत असतील, तर त्यांना दिले जाणारे ९ टक्के व्याजदराचे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होऊ शकते.
कर्जाची रक्कम आणि अर्ज प्रक्रिया
- कर्जाची मर्यादा: एका महिलेला १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
- गटाने व्यवसाय: पाच ते १० महिला एकत्र येऊन गट तयार करून व्यवसाय सुरू करू शकतात.
- अर्ज प्रक्रिया: कर्ज मिळवण्यासाठी महिलांना मुंबई बँकेत अर्ज करावा लागेल. बँक अर्जाची आणि व्यवसायाची तपासणी करेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेनुसार, ‘लाडक्या बहिणी’चे पैसे उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात यावेत आणि महिला आत्मनिर्भर बनाव्यात, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे मुंबईतील १२ ते १३ लाख लाभार्थी महिलांना मोठा फायदा होणार आहे.